यामाहा टीन्स रॉक २०२६ स्पर्धेत मिझोरामच्या न्यूहोफ स्कूल बँडची बाजी; बंगळुरूमध्ये युवा संगीतकारांच्या कलागुणांचा उत्सव

Oct 8, 2026 - 13:05
Oct 8, 2026 - 13:18
 0
यामाहा टीन्स रॉक २०२६ स्पर्धेत मिझोरामच्या न्यूहोफ स्कूल बँडची बाजी; बंगळुरूमध्ये युवा संगीतकारांच्या कलागुणांचा उत्सव
यामाहा टीन्स रॉक २०२६ स्पर्धेत मिझोरामच्या न्यूहोफ स्कूल बँडची बाजी; बंगळुरूमध्ये युवा संगीतकारांच्या कलागुणांचा उत्सव

बंगळुरू : देशभरातील युवा संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी देणाऱ्या ‘यामाहा टीन्स रॉक २०२६ – द बॅटल ऑफ बँड्स’ या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा बंगळुरू येथील प्रेस्टीज सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये उत्साहात पार पडला. यामाहा म्युझिक इंडियाने ट्रिनिटी कॉलेज लंडनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या स्पर्धेत तरुण कलाकारांनी संगीतकौशल्य, कल्पकता आणि सांघिक कामगिरीचे प्रभावी दर्शन घडवले.

या राष्ट्रीय स्पर्धेत मिझोराममधील न्यूहोफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या न्यूहोफ स्कूल बँडने विजेतेपद पटकावले. तमिळनाडूतील सीएस अकॅडमीचा सीएस हाऊलर्स बँड प्रथम उपविजेता ठरला, तर पश्चिम बंगालमधील श्री हनुमान मंदिर धर्मशाला स्कूलच्या द एप्रिसिटी बँडने द्वितीय उपविजेतेपद मिळवले.

महाअंतिम फेरीत सहभागी बँड्सनी दमदार सादरीकरण केले. याशिवाय केएम म्युझिक कन्झर्व्हेटरी, द सनशाइन ऑर्केस्ट्रा आणि यामाहाशी संलग्न कलाकारांच्या विशेष सादरीकरणांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामाहा म्युझिक इंडियाचे ब्रँड ॲम्बेसेडर आणि प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची उपस्थिती हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या उपस्थितीत कला सादर करण्याची संधी मिळणे हा युवा संगीतकारांसाठी संस्मरणीय अनुभव होता.

यावेळी ए. आर. रहमान म्हणाले, “संगीत हे तरुणांना स्वतःच्या भावना आणि विचार व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. टीन्स रॉकसारख्या उपक्रमांमुळे त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते. विविध भागांतून आलेल्या या युवा कलाकारांनी आत्मविश्वासाने आणि उत्कटतेने केलेले सादरीकरण पाहून आनंद झाला. सर्व अंतिम स्पर्धकांचे मी अभिनंदन करतो. या अनुभवातून त्यांना सातत्याने शिकण्याची, नवनिर्मिती करण्याची आणि संगीतात स्वतःची स्वतंत्र ओळख घडवण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.”

यंदाच्या स्पर्धेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. ६८० हून अधिक नोंदणी आणि २७० पेक्षा जास्त व्हिडिओ प्रवेशिका प्राप्त झाल्या. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा विविध टप्प्यांतील निवड प्रक्रियेनंतर देशातील १३ यामाहा म्युझिक स्क्वेअर केंद्रांवर उपांत्य फेऱ्या पार पडल्या. त्यातून पाच विभागीय विजेते आणि प्रेक्षकांच्या मतदानातून निवडलेला एक बँड अशा एकूण सहा बँड्सना महाअंतिम फेरीत स्थान मिळाले.

स्पर्धेच्या परीक्षक मंडळात प्रसिद्ध कलाकार रणजीत बरोट, गुलराज सिंग आणि रिदम शॉ यांच्यासह ट्रिनिटी कॉलेज लंडनचे संगीत व सादरीकरण कला विभागाचे संचालक स्टुअर्ट ब्रायनर यांचा समावेश होता. स्पर्धकांचे मूल्यमापन संगीतकौशल्य, सर्जनशीलता, रंगमंचावरील वावर आणि सादरीकरणाच्या एकूण दर्जाच्या आधारे करण्यात आले.

यामाहा म्युझिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केन्नेई सकाई म्हणाले, “संगीत माणसांना एकत्र आणते, आत्मविश्वास वाढवते आणि सर्जनशीलतेला चालना देते, असा आमचा विश्वास आहे. टीन्स रॉक ही केवळ स्पर्धा नसून देशभरातील तरुणांना एकत्र संगीत शिकण्याची, स्वतःला व्यक्त करण्याची आणि रंगमंचावर आत्मविश्वासाने सादरीकरण करण्याची संधी देणारी चळवळ आहे.”

ते पुढे म्हणाले की, ट्रिनिटी कॉलेज लंडनसारख्या भागीदारांच्या सहकार्याने संगीत शिक्षण आणि प्रत्यक्ष सादरीकरणाच्या संधी अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा यामाहाचा प्रयत्न आहे. टीन्स रॉकला भारतातील आघाडीच्या युवा बँड स्पर्धांपैकी एक बनवण्याचे कंपनीचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे.

ट्रिनिटी कॉलेज लंडनचे भारत प्रमुख सचिन दास म्हणाले, “टीन्स रॉक हा संगीताचे शिक्षण आणि प्रत्यक्ष रंगमंचावरील अनुभव यांना जोडणारा महत्त्वाचा उपक्रम आहे. या माध्यमातून युवा संगीतकारांना सहकलाकारांसोबत काम करण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळते. संगीतकौशल्याबरोबरच कल्पकता, संघभावना आणि व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमात यामाहा म्युझिक इंडियासोबत सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे.”

यामाहा म्युझिक इंडिया आणि ट्रिनिटी कॉलेज लंडन या भागीदारीच्या माध्यमातून युवा कलाकारांसाठी संगीत शिक्षण आणि प्रत्यक्ष सादरीकरण यांमधील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील नवोदित संगीतकारांना प्रोत्साहन देण्याबरोबरच बँड संस्कृतीच्या विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे.

छायाचित्र ओळ: यामाहा टीन्स रॉक २०२६ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा मिझोरामचा न्यूहोफ स्कूल बँड.

 

NR Team नेशन रिपब्लिक ही एक भारतीय वृत्त माध्यम प्रकाशन वेबसाइट आहे जी मनोरंजन, क्रीडा, आरोग्य, राष्ट्रीय, राजकारण आणि बरेच काही यासारख्या विविध डोमेनवरील ताज्या बातम्या आणि अद्यतने प्रदान करते.